Saturday, June 13, 2009

आस्तित्व

माणसाच्या आपल्या आस्तित्वाबद्दलच्या काय काय कल्पना असतात नाही? किती वृथा अभिमान असतो त्याला आपल्या 'असण्याच्या'! अणि हे सगळं मृत्युच्या उघड्या - नागड्या अस्तित्वाच्या पार्श्वभूमीवर! किती हास्यास्पद वाटतो हा अभिमान! अगदी असा आपल्यापुढे उभा असतो मृत्यु - फक्त दिसत नसतो। आपल्या अगदी आजूबाजूला वावरत असतो, पण जाणवत नसतो। आणि कधी आलाच समोर आपल्या कोर्या स्वच्छ स्वरूपात तर केवढं बिचकल्यासारखं होतं। सगळं माहित असूनही कसं अजाणतेपणाच आवरण ओढून घेतो आपण! अगदी 'तो मी नव्हेच' चा आव आणून प्रयत्न करत राहतो त्याला टाळण्याचा! कधी क्षणिक टळतोही तो! मग नंतर हाती उरते ती फक्त त्या रुपाची भीती! आता काही तो परत येणार नाही अशी ग्वाही तर देता येतच नाही, उलट 'कधीही येइल बरं परत' असा धसकाच मन कणाकणानं मोडून टाकतो।
असतात काही काही महाभाग 'बघू तर गम्मत या अनुभवातली' च्या धर्तीवर त्याला सामोरे भेटायला सज्ज! पण कुणाकुणाला कसा यावा किंवा वाटावा तो अनुभव हे समजुन घेणं कठिणच!
मग उरते नुसतीच कल्पना! बरं, कल्पनेला तरी किती पंख असावेत? केवढ्या भरार्या घ्याव्यात विचारांच्या अवकाशात? क्षणात इकडे, क्षणात तिकडे, क्षणात वर, क्षणात खाली! पण कल्पना नेहमी मोहावतेच! भूरळच पाडते। मृत्युच्या आस्तित्वाची कल्पनाही अशीच भुरळ पाडते। अनावर आकर्षण किंवा कुतूहल जागं करते ती। भीती नसतेच मुळी मनात। भीती सगळी प्रत्यक्ष अनुभवाची - अनुभवाच्या कल्पनेची नाहीच।
देवावर श्रद्धा असणार्यांकरता किती सोप्या पळवाटा असतात। मृत्यु जवळपास फिरकणार नाही यावर तगडा विश्वास आणि सामोरं जावच लागलं मृत्युला तर त्याकरता लागणारं धैर्य देवाकडून मिळेलच उधार याची खात्री! त्यामुळे मृत्यु कधीही येवो, ही श्रद्धा त्यांना तगवते। पण जिथे नास्तिकतेची शिदोरी गाठीला बांधली आहे, त्या प्रवासाच्या कहाण्या तरी किती सांगाव्यात? आस्तिकांच्या श्रद्धा त्यांना किती तारतात हे ठाउक नाही पण नास्तिकतेला एक शाप असतो - स्वत्वाचा! कशावरंच श्रद्धा नाही म्हणजे प्रत्येक घडण्यावर आपल्या स्वतंत्र विचारांचा ठसा उमटवून दाखवणं आलंच। कुणावर काही सोपवायचं नाही म्हणजे स्वताःवरच्या विश्वासावर खम्बीरपणे उभं राहणं आलंच। हे असे किती टप्पे ओलान्डायचे, गाठायचे, मागे सोडायचे, याचं गणित जमवणं ही ओघानी आलंच।
या सगळ्या करण्या-न-करण्यात तो कसा, केव्हा धड़केल या अशाश्वत जाणिवा तर फेर घालतंच राहणार। ठराविक वेगात, ठराविक गतीत, ठराविक त्रिज्येच्या चाकोरीत। आपण आपलं धडकत रहायचं या जाणिवान्वर। ठेचा लागायच्याच, काळीज फाटायचंच, जखमा व्हायच्याच। हे चक्र चालतच राहणार। ते थांबणार अगदी अचानक। फट म्हणता सगळं संपलं, थाम्बलं। कल्पना संपल्या, जाणिवा संपल्या, श्रद्धा संपल्या, आस्तिक-नास्तिकतेचा खेल संपला, वेदना संपल्या, विश्वास संपला, स्वत्व संपलं, अभिमान संपला। धाड़ - दरवाजा बंद, विचार बंद, फेर बंद, प्रवास बंद। कोसळायचं तरी कुठे?
पण क्षणा-क्षणाला कुरतडण्यापेक्शा हे बरं। फट, धाड - संपलं, बंद......

Sunday, February 1, 2009

धुकं

धुक्याला सवयच असते
अलगद हवेत फिरायची
तुला जशी अल्लडपणे
माझ्या कवेत शिरायची.

धुकं आणि दव यांचं
नाजूक फार नातं आहे
थंडीच्या धुक्यातही शहारत
उभं दवाचं पात आहे.

Friday, January 16, 2009

वारसा

आपण आपल्या मुलांवर प्रेम करतो - म्हणजे नक्की काय करतो ?
त्यांच्या जडणघडणीतल्या प्रत्येक टप्प्यावर आपलही योगदान असायला हवं असतं - म्हणजे नक्की कुठल्या प्रकारचं योगदान?
आपण आपल्या मुलांकरिता वेळ काढतो - म्हणजे नक्की किती आणि कुठला?
एक पालक म्हणून मला हे सारं प्रामाणिकपणे वाटतं खरं .... पण मग पुढच्या प्रश्नाचं काय?
आज आपल्या मुलांना आपण काय देतोय ?
पावसात चिम्ब भिजण्याचा आनंद लुटू देतोय ?
सळसळणार्या पिकांच्या शेतात हुन्दडू देतोय ?
पक्षांच्या चिवचिवाटाबरोबर गाऊ देतोय ?
मातीच्या ओलाव्यात रमू - भिजू देतोय ?
अवतीभोवतीच्या निसर्गाचं गाणं ऐकू देतोय ?
तार्यांचे टिमटिमणे मुग्ध होवून बघू देतोय ?

सापडतील ... सगळी उत्तरं सापडतील। पण त्याआधी काही हरवलंय याची जाणीव व्हायला नको?



Wednesday, January 14, 2009

समृद्धी

जी एं चं ओर्फियस भन्नाटच वाटलं। त्यांच्या कथा, कथांचे बीज, त्यांचे शब्द, त्यांची वर्णनं, त्यांच्या उपमा, त्यांची पात्र, त्यांची वातावरण निर्मिती, त्यांची मान्डणी सगळच कसं अंगा - मांसा - रक्तात भिनतच जातं। आपल्या हातात काहीच नसतं। जी एं वाचत जावे आणि तो अनुभव ज्वालामुखीसारखा जगत जावा एवढाच एक पर्याय त्यांची पुस्तकं हाती घेतली की उरतो। किती तरी तास, दिवस हे सगळच मनात फिरत रहातं, रेंगाळत रहातं। गौरी देशपांडे, अनिल अवचट सगळे कसे आपल्याला जागोजागी भेटतात। किती किती आणि कितीदातरी वाचलं तरी ओढ़ वाढतंच जाते। या भावविश्वातून बाहेर पडायचीच तयारी नसते आणि मग जगरहाटीच्या नेहमीच्या चक्रात अडकताना यांचे शब्दच केवढा आधार देतात। नेहमीच।

Tuesday, January 13, 2009

गुलज़ार चे चंद्र

गुलज़ार च्या चन्द्रांनी गेल्या -३ पिढ्या तर भारावल्या आहेतच - पण नव्या पिढीलाही हा चंद्र वेडावतो आहेच। अगदी चाँद चुराके लाया हूँ पासून एक सौ सोला चाँद की रातें म्हणत म्हणत चाँद का टिका मथ्थे लगाके रात दिन तारोंमे जीना वीणा इजी नहीं पर्यंत पोहोचणारा हळवेपणा, ती आतुरता, भावूकता या चंद्राने इतकी वर्षे जपून ठेवलीये।

Tuesday, January 6, 2009

सकाळ

सकाळच्या कोवळ्या उन्हाची तिरीप खिड़कीतून आत शिरत होती। पक्ष्यांची किलबिल कानावर पडू लागली। दिवस सुरु झाल्याची एवढी नाजूक चाहूल कुणाला नाही आवडणार? वाटा चाहूबाजूनी गजबजू लागल्या। रस्तेही उत्सुक पावलांच्या स्वागताला तयार झालेत। पानांची सळसळ मंद हवेच्या झुळूकेच्या कानात गुणगुणू लागली। आकाशावर उगवलेल्या सूर्याच्या प्रवासाचीच ही तयारी होती।
आपला रोजचा दिवस असा उगवतो का? आपल्या रोजच्या दिवसाकडे आपण इतकं निरखून कधी बघतो का? आपल्या रोजच्या दिनक्रमात या छोट्या छोट्या नोंदी आपण करत असतो का?

Friday, October 10, 2008

सामुदायिक योगदान

एड्स हा सांसर्गिक असला तरी तो साध्या स्पर्शातून किंवा नुसत्या बरोबर राहण्याने पसरणारा नाही हे आता जवळ जवळ सर्वांनाच अवगत आहे। पण त्याची सुरुवात कशी झाली याबाबत नुसत्या शंकाच नाही तर गैरसमजच जास्त आढळतात। आणि अनुषंगानी त्या व्यक्तीला मिळणारी वागणूक किंवा तिच्याबद्दलच्या किळसवाण्या भावना यामुळे तिचे जे मानसिक खच्चीकरण होते त्याला या समाजाचेच घटक म्हणून आपण जवाबदार आहोत ही जाणीव आपल्यात असणं अतिशय आवश्यक आहे।
एड्स ची लागण झाली आहे हे लोकांपासून लपवून आपण खरं तर त्यावर घेता येणारे उपचार, जे की अत्यावश्यक आहेत, आणि आपल्या लोकांच्या बरोबरच्या संवादाच्या शक्यताच संपवून टाकतो आहोत हे ही ज्याला लागण झालीय त्यानी आणि त्याच्या कुटुंबियांनी लक्षात घेतले पाहिजे।
एड्स हा बोलायाचाच विषय आहे, लपवायाचा नाही हे इथे महत्त्वाचे।
एड्स वरच्या विद्यमान उपचारांमुळे एक निरामय आयुष्य आपण जगू शकतो ही सत्य परिस्थिती आहे। शिवाय त्याची कारणे केवळ अनैतिक सम्बद्ध नसल्यामुळे आपण स्वतःच्या नजरेत उतरण्याची ही गरज नाही हे ही तितकंच खरं आहे।
समाजात याबद्दल पसरलेले गैरसमज दूर करणे एकवेळ सगळ्यांना जमणारही नाही पण स्वतः तरी याबाबत जागरुक राहण्याची तयारी जरी प्रत्येकाने दाखवली तर निदान लागण झालेल्यांना जगण्याचं बळ नक्कीच मिळेल.