Wednesday, May 18, 2011

ग्रेस

दुर्बोधतेचा सम्बन्ध प्रत्यक्षपणे जीए किंवा ग्रेस यांच्या लेखांशी/ कवितांशी जोडला जातो। यातील काही कल्पना दुर्बोधातेच्या जाणीवांतून बाहेर पडून सरळ, सोप्या भाषेत मनांपर्यंत पोहोचतात। अश्याच काही कल्पनांबद्दल ......
ग्रेस म्हणतात - थेम्बांचे पक्षी कुठल्यातरी परदेशी रानात उडून गेले।
- एका पावसाळ्यातली गोष्ट। झाडा-पानातून निथळणाऱ्या सरी अंगावर झेलत उभी असलेली ती। डोळ्यांची पाखरं भिरभिरत या फुलावारून त्या फुलावर मुक्तपणे विहरत होती। फडफडणारा पदर, ओलेती साडी, विस्कटलेल्या बटा, सगळंच कसं सावरायचं? आणि हे सावरण्याच्या नादात पावसाच्या बेभान नृत्याला विसरायचं? कसं जमणार? एकच क्षण निर्णायक. तिनं स्वतःलाच बेभान सोडलं. पावसाचा थेंब न थेंब अनुभवायचा होता तिला. त्याच्या पदन्यासात आपलाही ठेका जुळवायचा होता तिला. ती पदर विसरली, बटा विसरली आणि मग्न झाली पावसात! फक्त पाऊस आणि ती, ती आणि पाऊस! ओठांवर गाणं, डोळ्यांत गाणं, चेहेऱ्याच्या रेषेत न रेषेत गाणं, पायात गाणं, इतकंच काय तर कमरेत ही गाणं, स्तनांत गाणं! नखांनखांत नसांनसांत गाणं!

याला स्वैर वर्तन म्हणायचं का? की निरागस नर्तन? वय स्वैर वर्तनाचे, भाव निरागस नर्तनाचे.

पाऊस थांबला. क्षणांत भान आलं. गाणं, नर्तन सगळंच थांबलं. डोळे स्थिर झाले. पावलं स्थिर झालीत. केसांच्या बटांतून ओघळणारे थेंब मानेवरून, स्तनांवरून, कमरेवरून उतरत पावलांबरोबर पावले जोडून आपल्या देशी धावून गेले. आपल्या देशी? अंहं.. थेंबांचे पक्षी कुठल्यातरी परदेशी रानात उडून गेले. डोळ्यांतली फुलपाखरं ही आपल्या वाटेनं उडून गेलीत. जमिनीवर स्थिर राहिलीय ती! आपल्या मातीशी पुन्हा नाती जुळवत त्याच मातीची झालीय ती!

0 comments: